मराठवाड्यात दुष्काळचा पहिला बळी, टँकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

Foto
फुलंब्री- दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्यासाठी नागरिकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत असतानाच पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा टँकर खाली येऊन मृत्यू झाल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथील जोशी वस्तीवर झाला आहे. 
मृत सुनीता विजय हटकर (२३) ह्या शुक्रवारी आपल्या घराजवळ असलेल्या विहिरीवर रोजच्याप्रमाणे सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. याच विहिरीवर बळीराम सहाणे हा आपल्या खाजगी टँकर मध्ये पाणी भरण्यासाठी आला होता. विहीरीजवळ पाणी जास्त प्रमाणात सांडल्याने चिखल झालेला होता. टँकरच्या टायरमुळे त्याठिकाणी खड्डे पडले होते. बळीराम सहाणे याने टँकर भरल्या नंतर बाहेर काढताना टँकर पलटी झाले. सुनीता या ज्या बाजूने पाणी भरत होत्या त्याच बाजूने टँकर पलटी झाल्याने सुनीता टँकर खाली चिरडल्या गेल्या त्यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान वदोडा बाजर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले की बळीराम सहाणे याच्यावर कोणी गुन्हा दाखल करो न करो आम्ही सरकारच्या वतीने त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. पुढील तपास देखील अर्चना पाटील याच करत आहेत.